जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (07 मार्च) प्रथमच काश्मीरला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींचा दौरा लक्षात घेऊन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
यादरम्यान, पंतप्रधान अनेक प्रकल्पांचे उदघाट्न करणार आहेत . ते श्रीनगरमध्ये एका जाहीर सभेलाही संबोधित करतील. भाजपचे प्रदेश प्रवक्ते अल्ताफ ठाकूर म्हणाले, “आमच्यासाठी नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आमच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठे प्रोत्साहन असेल. विकासात्मक प्रकल्पांव्यतिरिक्त, ते काश्मीरच्या लोकांना चांगली बातमी देतील. याशिवाय पक्षाचे स्थानिक अध्यक्ष रवींद्र रैना यांनी सांगितले की, रॅलीत दोन लाख लोक सहभागी होतील. ते म्हणाले, “हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी आमचे कार्यकर्ते मोठ्या संखेने येतील”
माजी राजकीय कार्यकर्त्या शेहला रशीद यांनी ट्विटरवर लिहिले, “इंशा अल्लाह, उद्या पंतप्रधान मोदी श्रीनगरला भेट देतील आणि श्रीनगरमधील मुस्लिम तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या हजरतबलच्या एकात्मिक विकास प्रकल्पाचे उद्घाटन करतील. काश्मीरच्या इतिहासाची जाण असलेल्यांना या घटनेचे महत्त्व कळेल आणि आपण किती पुढे आलो आहोत हेही कळेल.