मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होईल. पंतप्रधानांच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोने घाटकोपर ते जागृतीनगर ही सेवा आज सांयकाळी 6 वाजल्यापासून बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही मेट्रो सेवा बंद असेल.
वाहतुकीच्या मार्गात बदल
विक्रोळी येथे सायंकाळी 6.30 वाजता मोदी यांचे आगमन होईल. रोड शोचा प्रारंभ 6.45 मिनिटांनी होऊन तो 7.45 ला समारोप होईल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम. जी. रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल. या गोष्टी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात खालीलप्रमाणे बदल केला आहे.
असा असेल रोड शोचा मार्ग
अशोक सिल्क मिल येथून रोड शो सुरु होईल.
पुढे रोड शो सर्वोदय जंक्शन ओलांडून मार्गक्रमण करेल.
एमजी रोड येथे डावे वळण घेऊन रोड शो घाटकोपर पश्चिमेकडून पूर्वेला जाईल.
घाटकोपर पूर्वेकडे वल्लभ बाग जंक्शन येथे पोहचेल.
याठिकाणी असलेल्या पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ रोड शो चा समारोप होईल.
विक्रोळी कांजूरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुन्नाभटी, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ वाकोला, वांद्रे, वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोर्ट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदी असणार आहे. मुंबईत येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेण्यात येणार आहे.