पंतप्रधान मोदी जम्मू – काश्मीर दौऱ्यावर! करणार अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन..

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दोन दिवस जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व करण्यासोबतच १,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी दि. २० रोजी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) येथे ‘युवा सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमात सहभागी होतील.

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे (जेकेसीआयपी) उद्‌घाटन करतील. त्यानंतर २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील एसकेआयसीसी येथे १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी होतील.यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील आणि सीवायपी योग सत्रात भाग घेतील.

जम्मू-काश्मीर मध्ये १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ८४ प्रमुख विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. रस्ते पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजना आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांचे उद्‌घाटन ते करणार आहेत. चेनानी-पटनीटॉप-नाश्री विभागातील सुधारणा, औद्योगिक वसाहतींचा विकास आणि ६ शासकीय पदवी महाविद्यालयांच्या बांधकाम प्रकल्पांची पायाभरणी ते करतील.

यावेळी पंतप्रधान कृषी आणि संलग्न क्षेत्रातील १,८०० कोटी रुपये खर्चाच्या स्पर्धात्मकता सुधारणा (जेकेसीआयपी) प्रकल्पाचेही उद्‌घाटन करतील. जम्मू आणि काश्मीर मधील २० जिल्ह्यांतील ९० प्रभागांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून, ३,००,००० कुटुंबांमधील १५ लाख लाभार्थींपर्यंत तो पोहोचेल. सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या २००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरणही पंतप्रधान करतील.