पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहू! खासदार उन्मेश पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ

जळगाव, २९ फेब्रुवारी : जळगाव लोकसभा मतदार संघात दिवसेंदिवस इच्छूकांची संख्या वाढत आहे. त्यातच एका कार्यक्रमात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण कार्यकर्ता म्हणून उभे राहण्यास तयार आहोत, त्यांच्या या वक्तव्यावर राजकारण्यांनी कान टवकारले आहेत. दरम्यान या मतदारसंघात इच्छुकांमध्ये सहकार भारतीच्या माध्यमातून काम करणारे दिलीप रामू पाटील, माजी आमदार स्मिता वाघ यांचीही नावे असून त्यांच्या नावांचीदेखील सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.लोकसभा निवडणुकीचे वारे आता गती घेऊन आहे. इच्छूक उमेदवारांची ओढ ही भाजपकडे जास्त असल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने जळगाव लोकसभा मतदार संघात जास्त स्पर्धा असल्याचे लक्षात येते.

जळगाव येथील एका कार्यक्रमाप्रसंगी खासदार उन्मेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यांची गुरूवारी जोरदार चर्चा सुरू होती. खा. पाटील म्हणाले, इच्छूकांची संख्या वाढते याचा अर्थ पक्षाचे कार्य वाढले आहे, ही पावती आहे. विरोधकांकडे उमेदवार नाहीत. याउलट भाजपची स्थिती आहे. पार्लमेंट्री बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असतो, किंतू परंतू नाही. खासदार- आमदार होण्यापेक्षा माझा भारत पुढे नेण्याच्या प्रयत्नातील अमृत काळाचे साक्षीदार होत असल्याचा आपल्याला अभिमान आहे. मी अगोदरही सांगितले की पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पार्लमेंट्री बोर्डाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहू यात शंका नाही. सक्षम भारत घडवायचा असेल तर राजकारणाच्या पलिकडे विचार करावा लागणार आहे, आपण मोठ्या मनाचे राजकारण करू, या उद्‌गारांची गुरूवारी राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू होती.