जळगाव : शहरातील विठ्ठल पेठ भागातील 55 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीला आली. दशरथ प्रेमराज पाटील (55, रा. विठ्ठलपेठ, जुने जळगाव) असे मयताचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दशरथ पाटील हे आपल्या परिवारासह विठ्ठल पेठ परीसरात वास्तव्याला होते. पेंटरचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी विठ्ठल पेठ भागात नवीन घर घेतले. शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी त्यांची पत्नी कंपनीत कामावर निघून गेली तर मुलगा हा मामाकडे राहतो. दशरथ पाटील यांनी घराच्या मजल्यावर राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची पत्नी घरी आल्या तेव्हा त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे दृष्य पाहून पत्नीने हंबरडा फोडला. यावेळी नातेवाईक व शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन मृतदेह खाली उतरविला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अमोल विसपुते हे करीत आहे.