पथविक्रेता समितीच्या दोन जागांसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान, सहा जागा बिनविरोध

जळगाव : शहर पथविक्रेता समितीच्या पथविक्रेत्यांमधून निवडूण द्यावयाच्या आठ जागांसाठी माघारीच्या मुदतीनंतर तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने सहा जागा बिनविरोध निवडूण आल्यात. तर अनुसूचित जाती प्रवर्गात तीन उमेदवारांनी माघार न घेतल्याने सोमवार, 26 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली.

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. यात 13 उमेदवारांपैकी 3 जणांनी माघार घेतल्याने सहा जागा या बिनविरोध निवडूण आल्यात. 2 जागांसाठी 3 उमेदवार अनुसूचित जाती या प्रवर्गात शुभम सुनिल जाधव, श्रावण बुधा अहिरे, मंगल युवराज शिरसाठ या तीघां उमेदवारांपैकी एकानेही माघार न घेतल्याने या दोन जागांसाठी सोमवार, 26 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

बिनविरोध निवडूण आलेले उमेदवार असे
इतर मागास वर्ग – विशाल किशोर पाटील, अल्पसंख्याक महिला राखीव: जैतुनबी इसाक पटवे, विकलांग महिला राखीव- स्वाती चंद्रशेखर शिंपी, खुला गट- दिनेश बाबुराव हिंगणे, खुला गट- रतन अबिकाप्रसाद तिवारी, तर खुला गट महिला राखीव- हिरकणी नंदु पाटील.

2 हजार 941 आहेत मतदार
शहरात 2 हजार 941 नोंदणीकृत पथविक्रेता आहेत. हे सर्व मतदार सोमवारी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. सोमवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होईल. सायंकाळी 5 वाजेनंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.