टाटा समूह: टाटा समूहातील प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटल लि.ने देशात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के कर्ज देणारी शैक्षणिक कर्ज योजना दाखल केली आहे.भारतासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, सिंगापूर आणि दुबईमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, व्यवस्थापन व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कर्ज मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना ७५ लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज आणि दोन कोटी रुपयांपर्यंतचे सुरक्षित कर्ज किंवा शिक्षणासाठीचा संपूर्ण खर्चाची रक्कम कर्जरुपाने मिळेल. टाटा कॅपिटल विद्यार्थ्यांना प्रवेश-पूर्व मंजुरी पत्र देते, त्यामुळे त्यांना प्रवेश सुरक्षित करण्यासाठी आपली अर्ज प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात मदत मिळते.
या योजनेविषयी माहिती देताना कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी विवेक चोपडा म्हणाले, ‘‘विश्वास आणि पारदर्शकता हे नेहमीच आमच्या व्यवसायाचे सर्वांत मजबूत आधारस्तंभ आहेत. पारंपरिक आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक कर्जामध्ये ट्युशन फीपासून प्रवास आणि वैद्यकीय खर्चापर्यंतच्या सर्व पैलूंचा समावेश आहे.उच्च शिक्षणाच्या आड येणाऱ्या सामाजिक-आर्थिक अडचणी दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या संधी मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे.’’