पवार आणि ठाकरेंच्या नाकावर टीच्चून बाळासाहेब थोरातांचं मोठ वक्तव्य; काय म्हणाले थोरात

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार. त्यासाठी आपण सर्वांनी चांगलं काम करा, असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. मविआमध्ये आधीच मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरु असताना आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, “लवकरच महाविकास आघाडीचं तिकीट वाटप होईल. काही आपल्याला मिळतील तर काही मित्रांना मिळतील. पण आपण सर्वांनी मनापासून काम करायचं. घरोघरी जाऊन लोकांना आघाडीचा संदेश सांगायचा तसाच काँग्रेसचाही संदेश सांगायचा. कारण त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यावेळी आपल्याला पुन्हा लढायचं आहे.”

“यावर्षी विधानसभा संपल्यानंतर मे महिन्यापर्यंत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूका होतील. या निवडणूकांमध्ये जर आपण काँग्रेस म्हणून चांगलं काम करू शकलो तर पुढच्या निवडणूकांमध्येही आपण जास्त चांगलं काम करु शकू. पुढच्या निवडणूका कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. या निवडणूकीत आघाडी म्हणून चांगलं काम करा. मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार. त्यासाठी आपण सर्वांनी चांगलं काम करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

मागील काही दिवसांत उद्धव ठाकरेंनी अनेकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी मित्रपक्षांना केली होती. परंतू, ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र, त्यानंतर आता बाळासाहेब थोरातांच्या काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याच्या वक्तव्यामुळे मविआत पुन्हा वाद निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.