पवार साहेब मोठे नेते, शरद पवारांनी त्यांच्या विधानाचा पुनर्विचार करावा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज लोणावळ्यात कार्यकर्ता संवाद सभेत शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा दिला होता. कार्यकर्त्यांना संवाद सभेला जाण्यापासून रोकण्यासाठी सुनील शेळकेंनी धमकवल्या प्रकरणी ”पुन्हा जर असं केलं तर शरद पवार म्हणतात मला…” असं म्हणत इशारा दिला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पवार साहेब मोठे नेते आहेत. इतकी वर्षे ते राजकारणात आहेत.या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी देणं योग्य नाही.

फडणवीस पुढे म्हणाले की, शरद पवारांनी त्यांच्या विधानाचा पुनर्विचार करावा. ते कुठल्या स्तराला आहेत, याचा विचार करावा. कुणी आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल असं मला वाटत नाही.

लोणावळ्यातील शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं सुनील शेळकेंनी आपल्याला धमकावलं आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडं केली होती. त्यानंतर शरद पवारांनी आमदार शेळकेंना इशारा दिला होता.