जळगाव : जिल्ह्यात तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात बऱ्याच शेतकरी नागरिकांकडे शेतीसोबत दुग्धव्यवसायासाठी गोवंश, म्हैस, शेळी, मेंढीवर्गीय पशुधन आहे. यापैकी बहुतांश पशुधनाच्या कानाला टोकन आहे. परंतु, काही नवजात वासरे वा गोवंशीय पशुधनाची बाराअंकी टोकनविना भटकंती सुरू आहे. या पशुधनाला ‘पशु आधार कार्ड’ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोहिम राबविण्यात येत आहे.
‘आधार कार्ड’मुळे लहानापासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक भारतीयाची ओळख सोपी झाली असून रेशन, शेषन, पीएम किसान, एसटी, बस, रेल्वे प्रवास सवलत यासारखे अन्य लाभ मिळणे सोपे झाले आहे. यातून फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसला आहे. त्याचप्रमाणेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या गाई, म्हशींसह अन्य पशुधनाला देखील ‘पशु आधार कार्ड’ देण्याची सुविधा 2020-21 पासून सुरू केली आहे. पुर्वी इनाफ प्रणालीवर नोंद होती, त्यात सुधारणा होवून आता एनडीएलएम या प्रणालीवर घेण्यात येत आहे.
दुग्धजन्य पदार्थ संबंधित बाजारपेठ विस्तार
दुग्धोत्पादन उपयुक्त पशुधनाच्या आरोग्यासोबत दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास याव्दारे मदत होणार आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात गोवर्ग पशुधन हे लाख 95 हजार 50 तर म्हैस वर्गीय पशुधन 2 लाख 21 हजार 234 असे एकूण लाख हजार पशुधन आहे. या सर्व गोवंश व म्हैसवर्गीय तसेच शेळी मेंढी वा अन्य पशूधनाचे या मोहिमेतर्गत पशु आधार कार्ड काढले जाणार असून याचा लाभ जिल्ह्यातील पशुपालकांना होणार आहे.
शेतकऱ्यांचें उत्पन्न वाढविण्याचा मानस
देशात दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार केला जात असून डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक पशुधनाला टॅग केले जाणार आहे. आधार कार्डसाठी बोटांचे ठसे, डोळे आदी बायोमेट्रिक माहिती घेतली जाते. त्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पशूधनाची बायोमेट्रिक माहिती संकलित होत असून एकत्रीत ठेवण्यासाठी डेटाबेस तयार केला जात आहे. पशुधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचें उत्पन्न वाढवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
लसीकरणासह मिळणार अन्य माहिती
केंद्रीय पशुपालन विभागाकडून पाळीव प्राणी, त्यांचे मालक, जात, उत्पादकते बाबत माहितीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे. यात एक यूनिक आयडी देण्यात येत असून पशुधनाच्या कानात 8 ग्रॅमच्या वजनाचा पिवळा टॅग व या टॅगवर 12 आकडी पशु आधार क्रमांक, यासोबत कार्डमध्ये एक यूनिक नंबर, मालकाचे विवरण, मोबाईल संपर्क क्रमांक, पशुधनाचे केलेले लसीकरण आणि ब्रीडिंगची माहिती नमूद असेल.
पशुधनाचे टॅगिंगच त्यांचे आधार कार्ड
देशातील प्रत्येक गाय अथवा म्हैस अन्य प्राण्यासाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असून याद्वारे जनावरांचे मालक घरबसल्या आपल्या प्राण्यांबाबत माहिती मिळवू शकतात. लसीकरण, जात, सुधारणा कार्यक्रम, उपचारांसह अन्य कामे यामुळे सोपी होणार आहेत. याबरोबरच जनावरांची खरेदी-विक्रीही हस्तांतरण प्रक्रिया यामुळे सोपी होणार आहे.
पशुपालन म्हणजे पशुपालकांसाठी एटीएम
शेतीसोबत दुग्धोत्पादनासाठी पशुपालन हे शेतकऱ्यांसाठी एटीएम मशीनच आहे. सद्यस्थितीत दूधाला 158 मिलीयन मे.टन. च्यावर मागणी आहे. हि मागणी आगामी 5 वर्षात वाढवून 270 ते 290 मिलीयन मे.टन पर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट असून शेतकरी पशुपालकांचे आर्थीक उत्पन्नाचा स्त्रोत बळकटीकरण करणे असा आहे.
‘पशु आधार कार्ड’ टॅगचे फायदे
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गायी, म्हशी, वराह, शेळ्या, मेंढ्यांच्या कानात टॅग लावण्याचे मोहिम सुरु आहे. ते लावण्यापूर्वी प्राण्यांचे कान स्पिरीटने स्वच्छ करूनच त्यानंतर हा प्लास्टिक ‘पशु आधार कार्ड’टॅग ॲप्लिकेटरद्वारे कानाच्या मोठ्या नसांना सुरक्षित ठेवतो.
टॅग मोहिमेत पशुधनाची नोंदणी करा
चाळीसगाव तालुक्यात 1 लाख 24 हजाराहून अधिक पशुधन आहे. बऱ्याच पशुधनमालकांकडील नवीन खरेदीविक्री केली आहे. त्यानुसार पूर्वी खरेदी केलेल्या मालकांच्या नावावरील पशुधन खरेदी नोंदी नुसार नवीन मालकांच्या नावावर अद्यावत नोंदी केल्या जाणार आहेत. या पशु आधार टॅग नोंदणी मोहिमेत पशुधनमालकांनी त्यांच्या पशुधनाची नोंद करून घ्यावी. या नोंदणीमुळे पशुधन चोरीला गेले अथवा वीज पडून वा अन्य नैसर्गीक दुर्घटनेत पशुधनाचा मृत्यू झाल्यास, नुकसानभरपाई लाभ मिळणे सुलभ होणार आहे. तसेच कर्जप्रकियेव्दारे विम्यासाठी अथवा पशुधन खरेदी विक्रीसाठी देखील टॅग अनिवार्य असून टॅगच्या आधारे पशुपालनाशी संबंधित अनेक योजनांचा लाभ घेता येईल.
डॉ. संदीप भट, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी, चाळीसगाव-भडगाव