पश्चिम विदर्भात गारपीट अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत पाऊस

नागपूर: पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत शनिवारी गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकट कोसळले आहे. अमरावतीत अर्धा तास गारपीट अमरावती : हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे शनिवारी दुपारी धामणगाव तालुक्यातील तळेगाव, देवगाव, जळका पटाचे, आसेगाव तसेच यवतमाळ मार्गावरील सर्व परिसरात पावसासह गारपीट झाली. अर्धा तास झालेल्या गारपिटीने हरभरा, तूर, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस व गारपिटीने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

या भागात तूर आणि हरभरा काढण्याचे काम गतीने सुरू होते. गहसुद्धा शेवटच्या टप्प्यात होता. परंतु, ऐन तोंडावर आलेला घास हिसकावून घेतल्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर उद्भवली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी करण्यात आली.यवतमाळातही नुकसान यवतमाळ जिल्हयातील बाभूळगाव तालुक्यातील खर्डा, गोंधळी गवंडी, एरनगाव या गावांमध्ये शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बोरा एवढी गार व वादळासह पाऊस बरसला. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा हरभरा, गहू व काढणीस आलेली तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.यवतमाळमधील गारपीट शनिवारी सायंकाळी ६ वाजता काही भागांत तुरळक पावसाने हजेरी लावली. देवळी तालुक्यातील रत्नापूर, इसापूर, काजळसरा तर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, आजनसरा आणि फुकटा येथेही बोराएवढ्या गारा पडल्या. त्यामुळे गहू व हरभऱ्याचे नुकसान झाले. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता.