पुणे : मान्सून पुन्हा एकदा लांबल्यामुळे नागरिकांची निराशा झाली असून बळीराजाची चिंतेतही वाढ झाली आहे. राज्यातही अनेक भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील शेतकर्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे त्यामुळे शेतकर्यांना अजून पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होतं मात्र यावर्षी मान्सूनच्या प्रवासाची गती मात्र थंडावली आहे. निम्मा जून महिना उलटून गेला तरी अद्याप मान्सून सक्रिय नसल्याने शेतकर्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जून महिन्यामध्ये एकदा पावसाचा खंड झाला की संपूर्ण खरीप हंगामावर वाईट परिणाम होतो. मान्सून लांबल्याने शेतकर्याच्या डोक्यावर चिंतेचे काळे ढग आता अधिक गडद होऊ लागले आहेत.
सध्या देशाच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट आहे. गुजरातला धडकलेल्या या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे. दरम्यान, यामुळे देशात काही भागात ऊन तर काही भागात पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, मान्सून पुन्हा एकदा लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून सध्या स्थिरावला असून २३ जूनला महाराष्ट्र आणि मध्य भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, दक्षिण आणि ईशान्य भारतात १८ ते २१ जून दरम्यान पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. त्यानंतरच्या दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता असून त्या पुढील आठवड्यात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.