पाकिस्तानचा अजेंडा जम्मू – काश्मीरमध्ये लागू होऊ देणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगातील कोणतीही शक्ती कलम ३७० पुन्हा लागू करू शकत नाही. त्यामुळे जम्मू – काश्मीरमध्ये पाकिस्तानचा अजेंडा लागू होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेस – नॅशनल कॉन्फरन्सला देत असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये केला आहे. जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा आणि श्रीनगर येथे प्रचारसभांना संबोधित केले.

यावेळी ते म्हणाले, एक काळ असा होता की लाल चौकात येऊन इथे तिरंगा फडकवणे जीव धोक्यात घालणारे काम होते. वर्षानुवर्षे लोक लाल चौकात यायला घाबरत होते. पण आता चित्र बदलले आहे. आता श्रीनगरच्या बाजारपेठांमध्ये ईद आणि दिवाळी या दोन्ही सणांची शोभा पाहायला मिळते. आता लाल चौक बाजार संध्याकाळपर्यंत गजबजलेला असतो, देशभरातून आणि जगभरातून विक्रमी संख्येने पर्यटक येथे येत आहेत. हा सकारात्मक विकासाचा परिणाम असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीवर पंतप्रधानांनी जोरदार टिका केली. ते म्हणाले, जम्मू – काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळणार आहे. त्याचप्रमाणे जगातील कोणतीही शक्ती जम्मू – काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करू शकत नाही. त्यामुळे काश्नीरमध्ये पाकचा अजेंडा लागू करू देणार नाही, असा इशारा आपण काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला देत आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले.

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सला उघडपणे पाठिंबा दिला आहे. ते म्हणतात की
कलम ३७० आणि ३५अ बाबत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा अजेंडा हा पाकिस्तानचा अजेंडा सारखाच आहे. म्हणजेच पाकिस्ताननेच काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पर्दाफाश केला आहे, असाही टोला पंतप्रधानांनी यावेळी लगावला आहे.