पाकिस्तानसोबत अखंड चर्चेचे युग संपले, शेजारी देशाविषयी भारताची भूमिका स्पष्ट : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

पाकिस्तानसोबत चर्चा करू, द्विपक्षीय चर्चा होईल, वगैरे शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. पाकिस्तानसोबत चर्चेचे युग आता संपले आहे; कारण या देशात भारतविरोधी धोरण म्हणून दहशतवादाचाच वापर केला आहे, अशा अचूक शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शेजारी देशाविषयी भारताची भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली.

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून संबंध चिघळले आहेत. दहा वर्षांपासून दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा जवळपास थांबली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा पाकिस्तानला भेट दिली असली तरी, संबंध अजूनही तणावपूर्णच आहेत. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत ठणकावले. पाकिस्तानसोबत अखंड चर्चेचे युग संपले आहे. यापुढे या देशासोबत कोणतीही चर्चा होणे शक्य नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

जयशंकर म्हणाले, जोपर्यंत जम्मू-काश्मीरचा संबंध आहे, कलम ३७० निष्प्रभ करण्यात आले आहे. त्यामुळे आपले पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध असू शकतात, हा मुद्दा आहे. मला हे सांगायचे आहे की, भारताची कृती इतरांवर अवलंबून नसेल. आपण निष्क्रीय नाही आणि घटना सकारात्मक किंवा नकारात्मक दिशा घेत असली तरी आपण कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देऊ.

काही दिवसांपूर्वी बांगलादेशात सत्ताबदल झाला. आम्हाला तत्कालीन सरकारशी बोलावे लागेल, हे स्वाभाविक आहे. सत्तेत बदल झाले आहेत आणि ते विस्कळीत होऊ शकतात, हे आम्हाला मान्य करावे लागेल. शेजारी देशांशी आपापसांत काही ना काही समस्या असतातच. मला असा देश दाखवा, ज्याचे शेजारी राष्ट्रांमुळे काही अडचणींचा सामना करावा लागत नाही, असा सवाल जयशंकर यांनी केला.

काही दिवसापूर्वी भारताचे मालदिवशीही संबंध बिघडले. यावर जयशंकर म्हणाले, मालदीवबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनात चढ-उतार आले आहेत. येथे स्थिरतेचा अभाव आहे. मालदीवशी आमचे जुने संबंध आहेत. हे नाते त्यांच्यासाठी ताकदीचे आहे, असा विश्वास मालदीवमध्ये आहे.