पाच वर्षांनंतर भाजपने ए. टी. नानांकडे सोपवली मोठी जबाबदारी

जळगाव । भारतीय जनता पक्षाचे जळगाव लोकसभेचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील हे पुन्हा एकदा पक्षात सक्रिय झाले आहे. त्यांच्याकडे भाजपने तेलंगणामधील दोन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार, हे मात्र निश्चित आहे.

माजी खासदार ए. टी. नाना पाटील जळगाव लोकसभा मतदार संघातून दोन वेळा निवडून आले होते. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी मिळणार, हे निश्चित मानले जात होतं. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर असताना त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं.

त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीची त्यांची हॅटट्रिक हुकली. त्यानंतर ए. टी. पाटील फारसे पक्षात सक्रीय दिसले नाहीत. पक्षाच्या बैठकीत, जाहीर कार्यक्रमांमध्येही ते दिसून आले नाहीत. मात्र आता ते सक्रिय होऊ लागले आहेत.

ए. टी. पाटील यांच्याकडे भाजपने तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणून त्यांची पक्ष नेतृत्वाने नियक्ती केली आहे. दोन जिल्हे आणि तीन विधानसभा क्षेत्राची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. मेहबूबाबाद जिल्ह्यातील डोनाकल विधानसभा मतदार संघात त्यांनी उमेदवारांचा प्रचार केला. या उमेदवारांसह प्रचाराचा फोटो व माहिती त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृवाने आपल्या सक्रीय करून घेतल्याचे त्यांनी दाखवून दिले.

माजी खासदार पाटील यांच्या सक्रीय होण्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भाजपचे लोकसभा निवडणुकीचे राजकीय गणित बदलणार हे मात्र निश्चित आहे. जळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार उन्मेष पाटील राहणार की नवीन उमेदवार असणार, या बाबत चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार पाटील यांच्या या सक्रियेतेमुळे नवीन चर्चा होणार, हेही निश्चित आहे.