पाठलाग करत डॉक्टरला संपवले; घटनेनं धुळे जिल्हा हादरला, आरोपीना जन्मठेप

dhule Crime News: शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील डॉ. प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे यांची चिमठाणे सबस्टेशनजवळ निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी घडली होती, या घटनेचे  साक्षीदार नसल्याने शिंदखेडा पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, दराणे फाट्यानजीकच्या गुरुदत्त पेट्रोल पंपवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुसटसा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. हाताच्या कांबीवरील टॅटूने आरोपींचा उलगडा केला, यानंतर अवघ्या तीन तासांत तिघांच्या मुसक्या आवळल्या. सुनावणी अंडर ट्रायल चालत एकाच आरोपींना दोन वेगवेगळ्या कलमांखाली जन्मठेप ठोठावण्याची धुळे जिल्ह्यातील ही पहिलीच ऐतिहासिक शिक्षा ठरली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.प्रेमसिंग गिरासे हे शिंदखेडा येथून दुचाकी आपल्या गावी नेत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिमठाणे ते सोनगीर रस्त्यावरील चिमठाणे सबस्टेशनजवळ त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या आरोपी श्याम मोरे व संदीप पवार यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थांबले नाहीत म्हणून मांडीवर चाकूने वार केला. यानंतर आरोपींनी दुचाकीने पाठलाग करत रस्ता अडवला. दुचाकीची चावी देत नसल्याने छातीसह विविध ठिकाणी चाकूने गंभीर वार करत ठार केले व दुचाकी घेऊन पोबारा केला.

शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३९४ व ३०२ अन्वये गुन्हा नोंद झाला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या घटनेला नव्हता. त्यात या प्रकरणी आरोपींना अटक व्हावी म्हणून आंदोलन सुरू झाल्याने शिंदखेडा पोलिस दुहेरी दबावात होते.तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांनी तपासाची चक्रे फिरवत पहिल्या टप्यात सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे ठरविले. दराणे फाट्यानजीकच्या गुरुदत्त पेट्रोल पंपवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कंबरेतून चाकू काढून दुचाकीच्या हेडमध्ये ठेवतानाचे दृश्य दिसून आले. मात्र, संबंधिताचा चेहरा दिसत नव्हता. मग डाव्या हाताच्या कांबीवरील टॅटूवरून शोधपत्रिका काढली. टॅटूवरून आरोपी खलाणे येथील श्याम असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने खलाणे गाठले असता तो तेथे नव्हता. त्याने आपली सासरवाडी माळीच येथे आश्रय घेतला होता व तेथून गुजरात राज्यात पळून जाण्याच्या बेतात होता.आरोपी श्यामला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने दुचाकी चोरीसाठी हत्या केल्याचे तसेच आपल्या सोबत गुन्ह्यात सहभागी असलेल्यांची नावे सांगितली.

दुचाकीधारक लघवीस थांबला तर त्याची गाडी पळवून न्यायची आणि ती गुजरात राज्यात जाऊन विकायची. चोरीच्या पैशांतून मौजमस्ती करायची. यातूनच त्यांनी डॉ. प्रेमसिंग गिरासे या निष्पाप तरुणाचा निघूण खून केला. डाव्या हाताच्या कांबीवरील टॅटुमुळे आरोपींपर्यंत पोहोचता आले.
– सुनील भाबड, तपासाधिकारी