जळगाव, पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शनिवारी शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने 29 जणांना विषबाधा झाली. यात 20 मजूर असून, उर्वरित 9 मुलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांवर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रुग्णांवर तत्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे व तालुका गटविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना तत्काळ सूचना दिल्या.
घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवरे गावात मध्यप्रदेश हून शेतमजुरीसाठी आलेल्या या 29 जणांनी शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसांपासून साचलेले पाणी पिल्याने विषबाधा झाली असावी, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. 29 जणांपैकी 2 जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्याधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी कुटीर रुग्णालयात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावातील पाणी नमुने आरोग्यसेवकांनी घेतले आहेत.आमदार चिमणराव पाटील यांनीही कुटीर रुग्णालयात रुग्णांची भेट घेत विचारपूस केली.
विषबाधा झालेले रुग्ण
विकम दिवाकर पावरा (वय 15), लोभान दिवान पावरा (वय 4), मिथून सखाराम पावरा (7), कैलास पावरा (12), नाण्या लालसिंग पावरा 10), हेमा दिवान पावरा (24), प्रमिला भीमसिंग पावरा (12), गीता गोविंदा पावरा (10), रेला पावरा (10), करीना पावरा (12), अंजली दिवान पावरा (13), नबिता राकेश पावरा (21), दीदी राकेश पावरा (10), अंजना राकेश पावरा (3), ईश्वर राकेश पावरा (2), रविना उंदारा पावरा (6), सविता कालसिंग पावरा (6), राधिका कालसिंग पावरा (2), फिरका कालसिंग पावरा (3), अजय कालसिंग पावरा (13), हिना सीताराम पावरा (11), सविता शैलजा पावरा (18), देल्या कालसिंग पावरा (11), पूजा सीताराम पावरा (1), नविता राकेश पावरा (22) व राधिका कालसिंग पावरा (2)