शहराच्या गुंडगिरीला खतपाणी घालणारा सट्टा, जुगार व गावठी हातभट्टीची दारू विक्री खुलेआम सुरू असून यातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. सट्टा, जुगार खेळणाऱ्या अनेकांचे संसार यामुळे रस्त्यावर आले आहेत. सट्टा, जुगार तसेच गावठी हातभट्टीची दारू सर्रास विकली जाते हे जगजाहीर झाले आहे. हे पारोळा शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही माहिती आहे. फक्त ते पोलिसांना माहिती नसते. म्हणून ‘अवैध धंदे जोमात पोलीस मात्र कोमात’ असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. याकडे पोलीस प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी अवैध धंदे फोफावले आहेत. अवैध धंद्यांना पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध धंदे पोलिसांचे खाद्य बनल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे.
शहरात विविध ठिकाणी सट्टा, जुगार, गावठी दारू अड्डे यांची विविध ठिकाणी दुकाने थाटली आहेत. राजरोसपणे सट्टा, जुगार खेळला जातोय. सर्वसामान्य व इतरत्र सर्वांना या अवैध धंद्यांविषयी सविस्तर माहिती असते. मात्र पोलिसांनाच याविषयी ठाऊक नसते.
अनेक जण सट्टा, जुगार यामुळे कर्जबाजारी झालेल्या अनेकांनी पलायन केले असून अनेकांनी जीवनही संपविल्याचा घटना घडल्या आहेत. त्यासोबतच सट्टा, जुगार, गावठी दारूच्या व्यसनाने अनेक मरणपंथाला आहेत. मात्र पोलिसांनी याकडे लक्ष वेधणे गरजेचे असताना अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करताना दिसत नाही? कुणाच्या तक्रारीवरून कारवाई केलीच तर ती पण थातूरमातूर कारवाई केली जाते. त्यातील एखाद्या पंटरला अटक करतात अन् लागलीच सुटका होते. दुसऱ्या दिवशी परत धंदा सुरू असा हा प्रकार एकंदरीत पोलिसातर्फेच अवैध धंद्याची पाठराखण होत असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांना अवैध धंद्यातून मलिदा मिळत असल्याने कारवाईसाठी धजावत नसल्याची चर्चा आहे. परिणामी अवैधधंद्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर तर शासनाने बंदी घातलेली असताना सर्रास विकला जात आहे. सट्टा, गुटखा जुगार यांना अभय असल्याने बिनदिक्कत कोणालाही न जुमानता ते धंदा करीत आहे. सट्टा,जुगार गुटखा जोमात सुरू असून बेकायदा दारू विक्रीतही वाढ झाली आहे. परिणामी लाखोंची कमाई होत आहे. त्या पैशाच्या गैरवापर होऊन सामजिक स्वास्थ्य बिघडत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शहरासह तालुक्यात सुरू असलेले बेकायदा व्यवसाय, काळ्या धंद्याची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी होत आहे.