पारोळा : येथील राष्ट्रीय स्वयंसवेक संघातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदू नूतन वर्षारंभ निमित्ताने शहरातील विविध मुख्य मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले. यात शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
शहरातील आझाद चौकापासून संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरुवात करण्यात आली. एरव्ही मोठे श्री राम मंदिरापासून संचलनाला सुरुवात करण्यात येत होती. मात्र यंदा प्रथमच स्थळ मध्ये बदल करण्यात आला.
सिद्धेश्वर महादेव मंदिर, मडक्या मारुती मंदिर चौक, मोठा महादेव चौक, गुरव गल्ली तलाव गल्ली, न. पा. चौक, गावहोळी चौक, रथ चौक, बालाजी मंदिर, अरविंद रोड, शनीमंदिर चौक, लष्कर गल्ली, राम मंदिर चौक, झपाट भवानी चौक मार्गे आझाद चौक वाणी मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला. दरम्यान विविध मार्गावरून संचलन सुरू असताना नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला. उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून जळगाव विभाग बौद्धिक प्रमुख विकासराव जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून डाँ. संकेतकुमार खरे यांच्यासह संघ कार्यवाह आणि सर्व संघ पदाधिकारी स्वयंसवेक उपस्थित होते.
शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष
शहरातील आझाद चौकापासून संचलनाला सुरुवात होवून विविध मुख्यमार्गावरून संचलन निघाले. मार्गावर नागरिकांनी आपले आगंन रांगोळ्यांनी सजविले होते. ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत झाले. शिस्तबद्ध पथसंचलनाने लक्ष वेधत चैतन्य निर्माण झाले होते.