पुणे: अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेसमधे आहे. दीड वर्षांपूर्वी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला होता. यावेळी कुख्यात गुंड गजानन मारणेनं पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवार आणि इतर नेत्यांचे स्वागत केले.
गजा मारणे कुख्यात गुंड, 3 वर्ष होता येरवडा कारागृहात
गजा मारणे कोथरूड मधील शास्त्रीनगर परिसरात आल्यानंतर गुन्हेगारीची मालिका सुरूच आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणेला अटक झाली. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत.भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत. सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमधे आले असता त्यांनी जयश्री मारणेंच्या घरी भेट दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.