धरणातून विसर्ग सुरु ; नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

जळगाव : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग होतो आहे. गिरणा, वाघूर, अंजनी यासह अन्य नद्यांच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगुन सुरक्षित राहावे आणि अडचण आल्यास  जिल्हा प्रशासन अथवा थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर आपत्ती पासून स्वतःचा बचाव करावा याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन केले आहे. राज्यात तसेच जिल्ह्यात दिवसें-दिवस पावसाचा जोर वाढत असून नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत.

जिल्ह्यातील धरणाची स्थिती बघितली तर  गिरणा धरण 74  टक्के भरले, विसर्ग सुरु आहे. हतनूर धरणातून 61,872 क्युसेक्स विसर्ग केला जातो आहे.गिरणातून 35 हजार ते 40 हजार क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील धरणे, बॅरेज भरले आहेत किंवा भरण्याच्या मार्गावर आहेत. नागरिकांनी गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पुराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावे, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे अथवा थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण व पुराच्या पाण्यात  जावू नये, तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन वाहन घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, विद्युत तारांना स्पर्श करू नये, कोणत्याही प्रकारे पुराच्या पाण्यात जाऊ नये, या पाण्याला कमालीचा वेग असतो. त्यामुळे अंदाज चुकू शकतो त्यामुळे कोणीही अशा पाण्यात जाण्याचे धाडस करू नये असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.