पावसाळ्यापूर्वी चारा साठविण्यासाठी पशुपालकांची तळपत्या उन्हात कसरत

पारोळा : येथील पशुपालकांना पावसाळ्याचे वेध लागले आहेत. पावसाळ्यापूर्वीचे नियोजनात सध्या पशुपालक गुंतले असून चारा साठविण्यासाठी तळपत्या उन्हात पशुपालक कसरत करत असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात कोरडा चारा मिळणे दुरापास्त बाब असते. त्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला ज्वारीचा चाऱ्याचा वर्ष भराचा साठा पशुपालक करून ठेवतात. म्हैस, बैल, गाय सह इतर पशुधन यांना दिवसातून तीन वेळा चारा द्यावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाऱ्याची पशुपालकांना आवश्यकता भासत असल्याने उन्हाळ्यातच पावसाळ्याचे नियोजन म्हणून मोठ्या प्रमाणात चाऱ्याची साठवणूक पशुपालक करतांना दिसत आहेत.

दुधाचे भाव जैसे थे; चाऱ्याचे भाव वधारले

गेल्या दोन वर्षापासून पशुधन यांना खायला दिला जाणारा ज्वारीच्या चाऱ्याचा भावात सातत्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे दुधाचे भावात कुठलीही वाढ होत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे पशुपालक अडचणीत सापडले आहेत. ३ हजार रुपये थैलीप्रमाणे मिळणारा चारा आता ६ हजारांवर पोहचला आहे. त्यामुळे पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

चाऱ्याचा भावात दुप्पटीने वाढ

दोन वर्षांपूर्वी ३ हजार रुपये थैलीप्रमाणे मिळणारा चारा आता ६ हजार प्रमाणे मिळत आहे. दुपट्टीने वाढ झाली आहे. मात्र दुधाच्या भावात वाढ नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे.
– सागर महाजन
पशुपालक, पारोळा