चोपडा ः पिस्टलाच्या धाक दाखवत कुरियर कंपनीचा माल डिलेव्हरी करण्यासाठी निघालेल्या चालकाचे अपहरण करून 14 लाखांचा माल लुटण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून दुसरा संशयित पसार झाला आहे. पोलिसांनी पिस्टल, पळवलेल्या चार चाकीसह लुटलेला 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
असे आहे अपहरण प्रकरण
चालक विनोद महारू पाटील (45, मालखेडा, ता.एरंडोल, ह.मु.उधना, सुरत) यांनी चोपडा ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, डिलेव्हरी डॉट कंपनीचा सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल कचोलीवाला हाफ, सुरत येथे खाली करण्यासाठी चारचाकी वाहन (जी.जे.05 सी.यु.1864) द्वारे निघाले असता 2 रोजी सायंकाळी 5.30 ते 3 रोजी सकाळी 9.30 दरम्यान वक्ताना, ता.सुरत व कोळंबा, ता.चोपडा येथे संशयित आकाश गोरख सोनवणे (26) व आकाश विठ्ठल कोळी (24, रीधूर, ईदगाव, जि.जळगाव) यांनी पिस्टलाचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले तसेच चारचाकीचा ताबा मिळवत हे वाहन कोळंबा, ता.चोपडा येथे आणले.
पोलिसांनी एकाला केली अटक
चोपडा ग्रामीण पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीची बोलेरो, कपडे, बुट व साड्या असा एकूण 13 लाख 97 हजारांचा मुद्देमाल व गावठी पिस्टलासह जिवंत काडतूस असा एकूण 18 लाख 97 हजारांचा ऐवज संशयित आकाश कोळी याच्याकडून जप्त करीत त्यास अटक केली तर दुसरा साथीदार आकाश सोनवणे मात्र पसार झाला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एल.नितनवरे करीत आहेत.