जळगाव । महाराष्ट्रासह देशातील वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झालंय. जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसात तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली. दरम्यान, अशातच पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
कुठे कुठे कोसळणार पाऊस?
अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. महाराष्ट्रातील काही भागातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात असा आहे अंदाज?
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि सांगली येथे येत्या शनिवारी आणि रविवारी(१० फेब्रुवारी- ११ फेब्रुवारी) ला ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या भागात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवार (०९ फेब्रुवारी, १० फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी) पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पुण्यातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. पुढील चार ते पाच दिवसांत पुण्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.