पुणे : वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरे यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर करुन, वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. वसंत मोरे यांना पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र अजूनही त्यांनी कुठल्याच राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही.
पुण्यात वृत्त वाहिन्यांशी बोलत असतांना, वसंत मोरे म्हणाले,मी लोकसभा लढणारच, पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही, मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते.अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आणि सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की ही निवडणूक एकतर्फी करू. पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत. रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर ते आमदारकीवरून खासदारकी लढवतील, मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे” असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
पुणे लोकसभेसाठी सध्या भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट जाहीर केलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातच आता वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेसाठी आपला निर्धार पक्का असल्याचं सांगत, कंबर कसली आहे.