पुणे : महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के रुग्णालयाच्या जागेवर हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे.पुण्यातील पहिले हेलीपॅड’सह पंचतारांकित हॉस्पिटल असणार आहे.
या प्रकल्पाबद्दल माहिती देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, या भागात मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे. रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील.
या प्रकल्पाची 99 टक्के फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क नेदरलँड्स गव्हरमेंटची एक कंपनी करणार आहे. म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणार आहे. पण दुर्दैवाने जर ते हॉस्पिटल होऊ शकले नाही किंवा अर्धवट राहिले तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर येणार नाही. अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर तो नेदरलँड्सची एजन्सी ही बँकरला परत करेल. तसेच मला सांगताना आनंद वाटतो की या प्रकल्पाला केवळ सव्वा टक्क्यांचा रेट ऑफ इंटरेस्टने कर्ज मिळालेले आहे. हे पहिले मॉडेल आहे, हे यशस्वी झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची मॉडेल्स तयार करता येतील. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.