पुणे : शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. त्यात सगळ्याच प्रकारचे गुन्हे आले. मात्र यातही अत्याचाराची आकडेवारी पाहिली तर अनेकांच्या भुवया उंचावणार आहे. पुण्यात मागील तीन वर्षात अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यंदा 2023 मध्ये तब्बल 394 बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. ही आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येतं.
त्यातच आता मराठी आणि हिंदी सिने क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिच्या प्रियकराने रिसॉर्टमध्ये नेऊन नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार विराज रविकांत पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री आणि विराज रविकांत पाटील यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकवर झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्रा वाढत गेली. मात्र विराज याचं लग्न झालं होतं तरीही त्याने घटस्फोट घेणार असल्याचे सांगत तिच्याशी ओळख वाढवून प्रेमाचं नाटक केले. त्याने अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यावेळी अभिनेत्रीने लग्नाला नकार दिल्यावर तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. नैसर्गिक आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.