शहादा, जि. नंदुरबार : येथील श्री. पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा पुरुषोत्तम पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी दिमाखात पार पडला. यावेळी व्यक्ती स्तरावर समाजसेविका भारतबाई देवकर (तुळजापूर) तर संस्था स्तरावर तर्पण फाउंडेशन मुंबई यांना रुपये एक लाखाचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन ‘पुरुषोत्तम पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात झालेल्या विचार मंथन, किसान दिन व पुरूषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील होते. यावेळी आमदार राजेश पाडवी, कमलताई पाटील, स्वामी अनादि देव (जयपूर), नंदुरबारचे माजी उपनगराध्यक्ष मकू, तर्पण फाउंडेशनचे संचालक मनोज पांचाळ व भरत वाघ, समाजसेविका भारतबाई देवकर (तुळजापूर), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, डॉ. कांतीलाल टाटिया, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीबेन पाटील, पोलीस निरीक्षक राजन मोरे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, ज्येेष्ठ कार्यकर्ते हैदरअली नुरानी, सुरत जिल्हा बँकेचे संचालक दिलीपभाई पटेल, सातपुडा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमसिंग आहेर, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते उद्धव रामदास पाटील, ईश्वर मंगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री रक्षा खडसेंच्या संदेशाचे वाचन
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. पी.के.अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी तर्पण फाउंडेशनच्या वतीने कमलताई पाटील यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी बोलतांना स्वामी अनादिदेव म्हणाले, परिसरातील ऋषी व कृषी संस्कृतीचे पाईक पी.के. अण्णा पाटील यांचे जनहिताचे कार्य अजरामर आहे.
अण्णांचे कार्य आणि योगदानाची वेळोवेळी प्रचिती
आ.राजेश पाडवी यांनी सांगितले, आमदार म्हणून गत पाच वर्षात परिसरातील विविध भागात भेटी देताना स्व.अण्णांचे कार्य आणि योगदानाची वेळोवेळी प्रचिती येते. त्यांचे सामाजिक, शिक्षण व सिंचनाचे कार्य अनमोल आहे. आपली वाटचाल त्यांचे थांबला तो संपला हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून अविरतपणे सुरू आहे.
तर्पण फाउंडेशनचे संचालक मनोज पांचाळ म्हणाले, शहादा हे नाव स्वर्गीय अण्णासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाने सर्वत्र पोहोचले आहे. शेतकरी बांधवांचा आर्थिक विकास व कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय घडवून देण्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था प्रभावशाली आहे. या परिसरातून फक्त विद्यार्थीच नव्हे तर चांगला शेतकरी घडवण्याचे कार्य सुरू असल्याचा आनंद आहे.
भारतबाई देवकर म्हणाल्या, अन्याय आणि संकटावर मात करण्यासाठी स्त्री शक्तीने एकत्र येणे आवश्यक आहे. संकटाला घाबरून आत्महत्या करण्यापेक्षा अल्पबचत करून स्वयंपूर्ण व्हावे. आजचा युवक युवतींनी संस्कार व जबाबदारीची जाणीव ठेवण्याचीही गरज आहे. महिलांनी एकजुटीने नारी शक्तीची ताकद दाखवणे काळाची गरज आहे.
2003 पासून अखंडपणे पुरस्कार प्रदान
बापूसाहेब दीपकभाई पाटील अध्यक्षीय समारोपात म्हणाले, शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक करण्याची शिकवण अण्णासाहेबांनी दिली असून परिसर विकास व शेतकरी सक्षम करणे हे आपले कर्तव्य आहे. जनतेच्या विश्वासास तडा जाणार नाही याची आपण सतत काळजी घेत असतो. येथील शेतकरी आत्महत्या करणारा नसून परिस्थितीशी सामना करणारा आहे. वेळेचे बंधन पाळण्याचे संस्कार तसेच सामाजिक कार्य समाजापुढे यावे यासाठी पुरुषोत्तम पुरस्कार सन 2003 पासून अखंडपणे प्रदान करण्यात येत आहे. प्रास्ताविक श्री पी.के.अण्णा पाटील फाउंडेशनचे सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन. प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. आभार पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील यांनी मानले. यावेळी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार भारतबाई देवकर व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला तर संस्था स्तरावरील पुरस्कार तर्पण फाउंडेशनचे संचालक मनोज पांचाळ व भरत वाघ यांनी स्वीकारला.