भारत जोडो न्याय यात्रा: यूपीमधील प्रयागराज येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत, स्वामी प्रसाद मौर्य आणि पल्लवी पटेल हे दोघेही सहभागी होणार होते. परंतु शेवटच्या क्षणी त्यांची योजना बदलली आणि ते दोघे यात्रेत सहभागी झाले नसल्याने, राहुल गांधींच्या न्याय यात्रेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
काल वाराणसीमध्ये योग्य सन्मान न मिळाल्याने पल्लवी पटेल नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. पल्लवी पटेल यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, त्या का सहभागी झाल्या नाहीत याचे कारण राहुल गांधीच देतील.स्वामी प्रसाद मौर्य लखनौहून रायबरेलीला रवाना झाले आहेत, तर पल्लवी पटेल काल वाराणसीतील यात्रेत सामील होऊन लखनौला गेल्या आहेत.अखिलेश यादव यांच्या नाराजीच्या चर्चेमुळे राहुल गांधींनी स्वामी प्रसाद मौर्य आणि पल्लवी यांच्यापासून तूर्त अंतर राखण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माहितीनुसार, स्वामी प्रसाद मौर्य आणि पल्लवी राहुल गांधींच्या न्याय यात्रेत सामील झाल्याच्या वृत्ताने अखिलेश यादव नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. पल्लवी पटेल यांचे पती आणि अपना दल कामेरवाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज निरंजन यांनीही आपली नाराजी आणि यात्रेत सहभागी न झाल्याची पुष्टी केली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना प्रयागराजमधील न्याय यात्रा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांनी रायबरेलीत आपला कार्यक्रम ठरवला. यापुढील प्रवासाची माहिती काँग्रेस पक्षाने दिल्यास विचार केला जाईल.