नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील जनतेला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर्नाटक विक्रीकरात वाढ केली आहे. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांनी वाढ होणार हे निश्चित मानले जात आहे.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, राज्य सरकारने 15 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलवरील ‘कर्नाटक विक्री कर’ (KST) 25.92 टक्क्यांवरून 29.84 टक्के आणि डिझेलवरील 14.3 टक्क्यांवरून 18.4 टक्के करण्यात आला आहे.
वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत हे वाढलेले दर तात्काळ लागू होतील, असे म्हटले आहे. बेंगळुरूमध्ये आता पेट्रोल 99.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 85.93 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.
कर्नाटकात लोकसभा निवडणुकीनंतर इंधनाचे दर वाढले आहेत. प्रत्यक्षात 5 हमीभावांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वर्षाला 50,000 कोटी ते 60,000 कोटी रुपये खर्च करावे लागतात. वित्त विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंधनाच्या किमती वाढल्याने चालू आर्थिक वर्षात सुमारे 2,500-2,800 कोटी रुपये उभारण्यास मदत होईल.