पैसे खात्यावर येईना; लाभार्थ्यांची समस्या सुटेना..!

विशाल महाजन,पारोळा, : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काही लाभार्थ्यांनी निकषानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र तरी देखील लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याने तहसील आणि कृषी कार्यलयात लाभार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना या 2 योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 3 टप्यात वार्षिक 12 हजार रुपये थेट खात्यात वर्ग करून अर्थसहाय्य केले जाते, त्यामुळे या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असतो. मात्र काही लाभार्थी शेतकऱ्यांना इ केवायसी, बँक खाते आधार लिंक, भूमी अभिलेख नोंदी व तत्सम कागदपत्रांची पूर्तता करून देखील लाभ मिळत नाही. विशेष म्हणजे पीएम किसानच्या संकेतस्थळावर लाभार्थ्यांच्या सध्यस्थीची तपासण्यासाठी सुविधा आहे. तेथे चेक केल्यानंतर कुठलीही कागदपत्रांची त्रुटी अथवा अपूर्णता दाखववित नाही, तरीही लाभ मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

कागदपत्रांची पुतर्ता करूनही लाभ मिळेना
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील अनेक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. लाभार्थी शेतकरी तहसील, कृषी कार्यालयात सारखी पायपीट करीत आहेत. ऑनलाइन प्रक्रिया असल्याने कार्यालय गाठून देखील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अवकाळी, अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटांनी शेतकऱ्यांना घेरले आहे. त्यातल्या त्यात यावर्षी उत्पन्न देखील 50 टक्क्यांनी घटले आहे. कापसाला देखील भाव नाही. यामुळे शेतकरी जेरीस आला आहे. समस्या मार्गी लावा अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.

….अन्यथा आंदोलन
शेतकरी अस्मानीसंकटांनी आधीच पिचला आहे. त्यात आधार देणाऱ्या योजनेपासून पात्र असतांना वंचित राहावे लागत असेल तर हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. अन्याय सहन केला जाणार नाही. समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन छेडणार
– सुनील देवरे, राष्ट्रीय अध्यक्ष- महाराष्ट्र शेतकरी संघटना,पारोळा