पोलिसावर चाकूहल्ला करणाऱ्या संशयिताची रेल्वेखाली आत्महत्या, कुटुंबियांना बसला धक्का, लोहमार्ग पोलिसात नोंद

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावरच 22 वर्षीय तरुणाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परीसरात रविवारी दुपारी दोन वाजता घडली होती. या घटनेतील संशयित आरोपी तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडालीआहे. सुनील व्यंकय्या मैलेलू (22, भुसावळ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, रेल्वे यार्डात सोमवारी सकाळच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह आढळला.

पोलिसावर केला होता हल्ला
शहरातील शिवदत्त नगरात रेल्वेतील निवृत्त कर्मचारी व्यंकय्या मैलेलू हे पत्नी व मुलगा सुनीलसह वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारी मैलेलू दाम्पत्याचा मुलगा सुनील मैलेलू (27) हा आई-वडिलांना शिविगाळ करीत त्यांचा खून करण्याची धमकी देत असल्याने त्रस्त कुटुंंबाने मदतीसाठी पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करीत मदत मिळण्याची अपेक्षा केली. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी अक्षय चव्हाण (32) हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास मैलेलू यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर सुनीलने किचनमधील पडलेला चाकू घेत अचानक चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्यात जखम झाली तर यावेळी संशयिताने पाय ओढल्याने जमिनीवर पडल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. चव्हाण यांनी तातडीने बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना उपचारार्थ डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात हलवल्यानंतर अधिक उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले तर संशयित मात्र पसार झाल्यानंतर त्याचा शोध सुरू असताना या संशयिताने मध्यरात्रीतून रेल्वे यार्डात आत्महत्या केल्याचा संशय आहे.

मृलाचा मृतदेह पाहताच कुटूंबियांना धक्का

| रेल्वे यार्डात कुठल्यातरी धावत्या कंटेनर वाहून नेणाऱ्या रेल्वेखाली सुनील व्यंकय्या मैलेलू या तरुणाने उडी घेत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी मृत तरुणाच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी धाव घेत ओळख पटवली. शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये तरुणाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, व विवाहित बहिण असा परिवार आहे. एकूलत्या एक मुलाने अचानक असे पाऊल उचलल्याने आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.