प्रकाश आंबेडकरांच महाविकास आघाडीला पत्र, दोन दिवसात जागावाटपाचा निर्णय द्या

अकोला: राज्यातील लोकसभा निवडणूक जवळच आल्या आहेत. परंतु अजूनही महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात ताळमेळ जुळलेला दिसत नाही. अश्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीला पत्र पाठिवले आहे.

महाविकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी या पत्रातून केली आहे. वंचित बहुजन आघाडीने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची 22 फेब्रुवारीला पत्रकार परिषद झाली. ती आम्ही बघितली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये 39 जागांवर एकमत झाले असून, लवकरच 27 किंवा 28 फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले होते.

प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेतील त्यांच्या विधानांचा पुनरुच्चार या पत्रात करण्यात आला आहे. मविआने वंचित बहुजन आघाडीला आत्तापर्यंत अंतिम झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती द्यावी. 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आमच्या शेवटच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केली होती. मविआकडून वंचितला तीन पक्षांमध्ये झालेल्या जागा वाटपाची माहिती मिळाल्यास तीन पक्षांना वैयक्तिकरीत्या किती जागा लढवण्यासाठी दिलेल्या आहे, ते समजण्यात मदत होईल. त्यामुळे त्या संबंधित पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी काही जागांसाठी वाटाघाटी करू शकेल.