भुसावळ: चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आल्यानंतर अप-डाऊन मार्गावरील तब्बल आठ रेल्वे गाड्या अर्धा तास ते सुमारे अडीच तासापर्यंत उशिराने धावल्याने रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नियोजन करून मंगळवारी ब्लॉक घेण्यात आल्याने ठिकठिकाणी रेल्वे गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
त्यात 11078 जम्मूतवी- पुणे झेलम एक्सप्रेस वाघळी स्थानकावर सकाळी 8.15 ते 11 वाजेपर्यंत (2.45 तास), 12142 पाटलीपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कजगाव स्थानकावर 8.30 ते 11 वाजेपर्यंत (2.30 तास), 15065 गोरखपूर- पनवेल एक्सप्रेस गाळण स्थानकावर सकाळी 8.40 ते 11 वाजेपर्यंत (2.20 तास), 11060 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पाचोरा स्थानकावर सकाळी 8.45 ते 11 वाजेपर्यंत (2.15 तास), 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा गोवा एक्सप्रेस ही गाडी माहेजी स्थानकावर सकाळी 9.50 ते 11 वाजेपर्यंत (1.10 तास), 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस म्हसावद स्थानकावर 10.30 ते 11 वाजेपर्यंत (30 मिनिटे) थांबवून ठेवण्यात आली. 15946 गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शिरसोली स्थानकावर 15 मिनिटे थांबवली होती. डाऊन मार्गावरील 20103 गोरखपूर एक्सप्रेस हिरापूर स्थानक येथे 25 मिनिटे थांबवण्यात आली होती.