प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची ‘या’नावाने होणार नवी ओळख

अयोध्या:  २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली श्री रामाची मूर्ती बालकराम या नावाने ओळखली जाणार आहे. या मूर्तीत प्रभू रामाला पाच वर्षीय बालकाला उभ्या असलेल्या स्थितीत दाखविण्यात आले आहे. रामललाच्या मूर्तीचे नाव बालकराम  असे ठेवण्यात आले आहे. ही मूर्ती पाच वर्षीय बालकाच्या स्वरूपातील असल्याने ‘बालकराम’ असे नाव देण्यात आले, असे प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानात सहभागी असलेले पुजारी अरुण दीक्षित यांनी  सांगितले.

ही मूर्ती पहिल्यांदा पाहिली, त्यावेळी मी रोमांचित झालो आणि नकळत अश्रू वाहू लागले. तेव्हा अनुभवलेल्या भावना मी व्यक्त करू शकत नाही, असे दीक्षित म्हणाले. आजपर्यंत केलेल्या प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानांपैकी रामललाची प्राणप्रतिष्ठा ही माझ्यासाठी सर्वांत अलौकिक आणि सर्वोच्च ठरली.

असे आहे रामललाचे वस्त्र
ही मूर्ती बनारसी कापडात सजलेली आहे. त्यात पिवळे धोतर, लाल पटका किंवा अंगवस्त्रम् आहे. अंगवस्त्रम् शुद्ध सोन्याच्या झरी आणि धाग्यांनी सुशोभित केलेले आहे. ज्यामध्ये शंख, पद्म, चक्रे आणि मयूर ही शुभ वैष्णव चिन्हे आहेत, असे न्यासने सांगितले.