प्रेम आंधळं असतं का?

धुळे : आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात ‘प्रतिभेचे बीज उमलताना’ या अभियानांतर्गत ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या मानसशास्त्रीय कार्यशाळेत ‘प्रेम आंधळं असतं का’ यावर प्रा. वैशाली पाटील यांनी मुलींना मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा प्रांतअधिकारी तृप्ती धोड्मिसे व गृहपाल अलका दाभाडे व मंजुश्री जाधव यांच्या सहकार्याने  झाली. या मानसशास्त्रीय कार्यशाळेत अनेक ऍक्टिव्हिटी व प्रश्न व उत्तराच्या माध्यमातून २६० मुलींनी त्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रा. वैशाली पाटील म्हणाल्या की,
माणसाची उत्क्रांती ही मुळात प्रेम या भावनेतून झाली आहे. त्यामुळे गर्भधारणे नंतर प्रथम भावनिक मेंदू तयार होतो, नंतर तार्किक, विचारी मेंदू तयार होतो. या मेंदुचा विकास भावनिक क्षेत्रातुन झालेला असतो. त्यामुळे मनुष्याची प्रत्येक विचार, कृती या प्रथम भावनिक मेंदूकडे जातात. त्यामुळे माणसाचा सामाजिक, राजकीय, आर्थिक कोणताही विचार हा प्रथम भावना केंद्रितच असतो.
शरीरातील सर्व संवेदना मज्जारज्जू कडून मेंदूकडे पाठवले. तिथे अँमँग्डाला या केंद्रांची भुमिका महत्त्वाची असते, तो ठरवतो विचार तार्किक मेंदूकडे पाठवायचा की भावना केंद्रीत ठेवायचा.
जन्मानंतर आई आणि बालकाचे नाळेचे जुळलेले नातं हे वयाच्या 18 व्या वर्षी कमी झालेले असतं 21 व्या वर्षी ते संपते. पुढे ते नातं संस्काराच्या व पालकांनी किती जिव्हाळा लावलाय बालकाला या शिदोरीवर आयुष्यभर चालत असतं. एकदा नाळेचं नातं तुटलं तर व्यक्तीला नकळत एकाकीपणाची भावना येते. हार्मोन्सं बदल होत असतात, आणि याच काळात जर कोणी बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड एकमेकांना भेटले तर ते क्षणात आपलेसे वाटतात. जर चुकून शारीरिक संबंध आले आणि घरातून प्रेमाची व संस्काराची शिदोरी जर कच्ची असेल. तर अमिग्डाला हा प्रेमाच्या बाबतीत आणीबाणी जाहीर करतो आणि व्यक्ती सगळे बंधन झुगारून प्रेमासाठी वाटेल ते करण्याचा प्रयत्न करते. म्हणून म्हटलं जातं प्रेम हे आंधळं असतं.
अशावेळी मुलींनी न घाबरता आवर्जून सांगायला हवं तुझं माझ्यावर प्रेम असेल तर लग्न होईपर्यंत तू थांबशील. लक्षात घ्या प्रेमाचं अधिष्ठान हे तार्किक मेंदूवर उभे असेल तरच ते प्रेम आयुष्यात यशस्वी होतं. कारण जीवन जगण्यासाठी प्रेमासोबत अनेक भौतिक, सामाजिक गरजा असतात.  कुठल्याही घटनेचा तार्किक विचार करायची सवय ही घरातूनच व आपल्या स्वः जाणिवेतून करणं गरजेचं आहे.  त्यासाठी विविध पुस्तकांचे वाचन, खेळण्याची वृत्ती, ज्येष्ठ लोकांसोबत संवाद, छंद जोपासणे गरजेचे आहे.
लक्षात घ्या खरं प्रेम कधीच बळजबरी करत नाही, आणि मानेवर सुरी ठेवून प्रेमासाठी दिलेला होकारा नंतर तुम्ही आयुष्यात असंख्य तडजोडींना व अगणित मनस्थापना निमंत्रण देतात.