तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। गणेश उत्सवाच्या काळात फुलबाजारात फुलांचे भाव प्रचंड वाढले आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव दरम्यानच महालक्ष्मी उत्सव सुरू होतो. त्यामुळे महालक्ष्मीने परिधान केलेल्या फुलांच्या हाराची किंमत प्रचंड वाढली आहे. गणेशोत्सवापूर्वी ७० ते ८० रुपये किलोने विकली जाणारी फुले आज १५० रुपयांवर गेल्याने आता पूजा विधीसाठी अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
फुलांच्या माळबरोबरच फुलांचे भावही गगनाला भिडले आहेत. पावसामुळे फुलांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. पहिल्यांदाच शेतातून नवीन पीक फुलबाजारात पोहोचले आहे. गणेशोत्सवा सोबतच महालक्ष्मी पूजन होत असल्याने फुलांच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले. यंदा पावसाने फुल शेती उध्वस्त झाली असून फुलांचे हार टिपटीने वाढले आहेत. फुलांची आयात स्थानिक शिरसोली, धामणगाव, तसेच नाशिक, सुरत, हैदराबाद, इंदूर, येथून होत आहे.
यावर्षी पाऊस अधिक झाला त्यामुळे फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गणेशोत्सव काळात तर फुलांचा दहा ते पंधरा रुपयांचा हार तीस रुपयांवर गेला आहे. गणेश भक्तांची इच्छा असूनही भाव वाढल्याने हार खरेदी करण्याबाबत नाराजी दिसत आहे. शहरांमध्ये सत्तरवर फुले व हार विक्रीचे दुकाने आहेत. बाप्पांच्या उत्सव काळात फुलांचे व हारांचे वाढणारे भाव भाविकांच्या खिशावर भार पडत आहे.
झेंडू, लिली, शेवंती, गुलाब, या फुलांचे हारांचे भाव गगनाला भिडले आहेत. यंदा गणेशोत्सवात दमदार पाऊस झाला त्यामुळे स्थानिक आवक घटली. तर अन्य ठिकाणाहून येणारा मालही कमी झाला त्यामुळे दोन दिवसात प्रचंड भाव वाढले आहेत.