जळगाव : कंपनीमार्फत शेअर- मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक फायदा मिळवा, असे आमिष दाखवित सायबर ठगांनी जळगाव येथील एका ग्राहकाला ९ लाख ८२ हजार ५० रुपयांना ऑनलाईन गंडा घातला. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाची चक्रे फिरवित चेंबूर (मुंबई) येथून अशरफ उमर सैय्यद (वय २६, रा. प्रकाशनगर नागरिक सोसायटी, चेंबूर) याला रविवार, २४ रोजी अटक केली. अशरफ याने त्याचे बँक खाते टक्केवारीने वापरण्यास दिले होते. सायबर ठगांनी या बँक अकाऊंट खात्याचा वापर केला. त्यानुसार बँक खातेधारक म्हणून रे पथकाने त्याला ताब्यात घेतले. २८ नोव्हेबर २०२३ पासून ते १५ जानेवारी २०२४ पावेतो सायबर ठगांनी जळगाव येथे तक्रारदाराच्या मोबाईल र फोनवर संपर्क साधला. अॅपेक्स कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा वे मिळेल, अशी बतावणी केली.
त्यानंतर या ग्राहकाला अपेक्स हे अॅप्लीकेशन डाउनलोड करण्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंतराव बेलदार, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत साळी, पो.हे.कॉ. हेमंत महाडीक, पो.कॉ. जाधव, पो.कॉ. गौरव पाटील यांच्या लोकेशनची मदत घेवून पथकाने चेंबर येथे सापळा लावून संशयिताला त्याच्या घरातून अटक केली.
शेअर खरेदीचा केला बहाणा
अॅप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर ठगांनी या तक्रार ग्राहकाला शेअर खरेदी करण्याचा फंडा सांगितला. वेळोवेळी त्यांना ऑनलाईन पैसे भरण्याचे सांगितले. आयसीआयसीआय बँक खाते, आयडीएफसी बँक, एयू स्मॉल बँक, उज्जीवन स्मॉल फायनॉन्स, इक्विटस बँक या खात्यामध्ये ऑनलाईन रकमेचा स्वीकार केला. ही रक्कम घेतल्यानंतर सायबर ठगांनी ग्राहकाला ना नफा दिला, ना मुद्दल रक्कम परत केली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर १६ जानेवारी २४ रोजी तक्रारीवरुन जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
बँक खाते सायबर ठगांना दिले कसे?
अशरफ उमर सैय्यद याचे स्वतःचे इक्विटस बँकेत अकाऊंट खाते आहे. मात्र त्याने हे अकाऊंट टक्केवारीने वापरण्यास दिले आहे. नफ्याचे आमिष दाखवत सायबर ठगांनी ग्राहकांकडून ऑनलाईन पैसे मागविले. यासाठी अशरफ याच्या बँक अकाऊंटचा क्रमांक त्यांनी ग्राहकांना दिला. ग्राहकाचे पैसे या खात्यातही जमा झाले. मात्र नंतर ही रक्कम सायबर ठगांनी परस्पर काढून घेतली. अशरफ याचा सायबर ठगांशी संबंध काय किंवा त्याने त्याचे बँक अकाऊंट वापरण्यास दिले कसे? सायबर ठगांशी त्याचा परिचय झाला कसा ? याचा शोध सायबर पोलीस संशयिताला कोठडीत घेऊन करत आहेत.