जळगाव : शहरातील विविध भागातील दोन घरांत घरफोडी करून भामट्यांनी चक्क साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शहर पोलिसांत व रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
स्नेहल सौरभ फडके (38, रा.पार्वती नगर, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 14 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या खाजगी कामानिमित्त ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या असता घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीचे ताट, समई, निरंजनी, चांदीचे शिक्के, कॅमेरा आणि रोकड असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. स्नेहल फडके या बुधवारी दुपारी दोन वाजता घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
जळगाव शहरातील शाहू नगरातील भोईटे गल्लीत शरीफ मोहम्मद भिस्ती हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. वरच्या मजल्यावर त्यांचा मोठा भाऊ वास्तव्यास आसून शुक्रवार, 5 मे रोजी ते गुजरातमधील अहमदाबाद येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता मंगळवार, 16 मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भिस्ती यांचा भाचा ईरशाद गुलाम भिस्ती याचा त्यांना फोन आला व त्याने तुमच्या घराचा कडी कोयंडा तोडलेला असल्याचे सांगितले. भिस्ती यांनी त्याला घरात जावून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार ईरशाद हा गेला असता त्याला कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी शरीफ भिस्ती यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार उमेश भांडारकर करीत आहेत.