मुंबई : पोलीसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्र सैनिकांनाही या प्रकरणात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले की, “बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या!” दरम्यान घटनास्थळी जमलेल्या आंदोलकांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. आरोपीला फाशी द्या, इतकीच मागणी त्यांनी पोलीसांकडे केली आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळावरुन बाजूला होण्यास नकार दिला आहे. पोलीसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, तरीही जमावाने पोलीसांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान संतप्त आंदोलकांनी शाळेचीही तोडफोड केली आहे. आरोपीला सनदशीर मार्गानेच ही लढाई लढावी लागेल, असे आवाहन पोलीसांनी केले आहे. घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन लवकरच दाखल होणार असून पोलीस अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.
पोलिसांच्या विनवण्या, आंदोलक ऐकेनात
गेल्या सात तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानक आंदोलकांनी भरगच्च भरलं आहे. आरोपीला आमच्या हातात द्या, नाहीतर त्याला तातडीने फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आंदोलकांनी सात तासांपासून रेल्वे वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर पडला आहे. कल्याण-कर्जत दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंदोलक आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीयत. पोलिसांकडून आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनवणी केली जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलं जात आहे. पण आंदोलक आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नाहीत.
विशेष म्हणजे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्जचा पर्याय अवलंबण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. कारण आंदोलक रेल्वे रुळावर मोठ्या संख्येने उभे असल्यामुळे आंदोलकांनी रेल्वे रुळावरील मोठी दगडं पोलिसांच्या दिशेला भिरकावली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करता आला नाही. यानंतर पोलिसांकडून अत्यंत सामंजस्याने आंदोलकांना विनवण्या केल्या जात आहेत. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.