सोयगाव: फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळासखेडा, ता. सोयगाव येथे बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा फर्दापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन पुरुष व पाच महिला ताब्यात घेतले आहे, तर एकजण ५५ हजार रोख रक्कम घेऊन फरार झाला आहे. लग्नाचं वय झालेल्या तरुणांच्या घरच्यांना दलालामार्फत लग्न लावून पैसे उकळण्याचे काम ही टोळी करत होती. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बनावट टोळीच्या माध्यमातून गुरुवार, दि.१८ एप्रिल रोजी पळासखेडा येथील दोन तरुणांचे लग्न होणार होते. त्यातील एका तरुणाचे लग्न धनवट शिवारातील वाघूर नदीच्या काठी असलेल्या चौंडेश्वर महादेव मंदिरावर लागले व दुसऱ्या तरुणाचे लग्न हे पळासखेडा येथेच होणार होते.
याबाबत नाशिक येथून लग्नासाठी आलेल्या नवरदेवाचा पुरुषोत्तम नरोटे यास वधूवर संशय आला व त्याने याबाबत त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी केली असता आधार कार्ड हे त्याला संशयास्पद वाटले व त्याने वधूला गावशेजारील वाकोद येथे नेऊन आधारकार्ड बाबतीत शहानिशा केली असता हे आधार बनावट असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने घडलेला प्रकार फर्दापूर पोलिसांना कळविला. पोलिसांनी या बनावट टोळीला ताब्यात घेतले. तपासणी अंती असे निदर्शनास आले की, या अगोदर ही या टोळीने अनेक लोकांची बनावट लग्न लावून फसवणूक केलेली आहे.
याप्रकरणी आरोपी सीताराम महिपाल सोनवणे रा. पहूर, ता. जामनेर,अशोक पवार रा.नाशिक सुमन प्रकाश जाधव रा. नाशिक रंजना कैलास आलीस रा. इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक, मीरा अनिल डांगे रा. लोणी खुर्द, ता. वैजापूर, रेणुका कमलाकर वस्त रा. टिटवाळा, कल्याण, अनिल सुखदेव डांगे रा.लोणी खुर्द, ता. वैजापूर यांच्याविरुद्ध संजय बाळाराम साकळे रा. पळासखेडा, ता. सोयगाव यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नीलेश लोखंडे, मकसूद तडवी, योगेश कोळी महिला पोलिस कल्पना चाथे, कविता चाथे हे करीत आहे.