मुस्लीम मोहरम महिन्याचा काळ सुरु असून देशाच्या विविध भागांत पॅलेस्टिनी झेंडे फडकवणे, डीजे वाजवण्यावरून वाद आणि हिंदूंवर हल्ले झाल्याची प्रकरणे निदर्शनास येत आहेत. बरेलीमध्ये डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर आता हिंदूंच्या घरांवर हल्ले झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून मिरवणूक चुकीच्या मार्गाने काढल्याने हिंदूंनी यास विरोध दर्शविला होता.
हे प्रकरण बरेलीच्या शाही पोलीस ठाण्याच्या गौसगंज गावातील आहे. येथील एका परिसरात मोहरमची मिरवणूक काढण्यात येत होती. ही मिरवणूक दरवर्षी काढण्यात येणाऱ्या मार्गावरून न जाता हिंदू वस्तीत नेण्यात येत होती. तेव्हा हिंदूंनी त्यास विरोध केला आणि पूर्वी ज्या मार्गाने मिरवणुका जात होत्या त्याच मार्गाचा वापर करण्यातात सांगितले.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री शत्रुत्वामुळे १०० हून अधिक कट्टरपंथीयांनी हिंदू लोकांच्या घरात घुसून दगडफेक, तोडफोड करत लोकांना मारहाण केली. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच जिल्हा पोलीस त्याठिकाणी पोहोचले. यावेळी पोलिसांनी नाकाबंदी करून १० कट्टरपंथीयांना पकडून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी ४० नामांकित आणि ६० अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.