तळोदा : गुजरात राज्य परिवहनच्या बसच्या धडकेत मोटरसायकलवरील महिलेचा मृत्यू झाला असून, या महिलेचा पती जखमी झाल्याची घटना 8 रोजी तळोदा येथे घडली. तळोदा येथील शनी गल्लीत राहणारे अभिजित किसनसा कलाल (वय-45) व अवंतीका अभिजित कलाल (वय 38) हे त्यांच्या मोटरसायकलने नंदुरबार येथे दवाखान्याच्या कामासाठी जात होते. त्यांच्या मिशन स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीला भेटून बायपास मार्गे चिनोदा चौफुलीकडे जात असताना बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील बालाजी पेट्रोल पंपासमोर त्यांच्या
मोटरसायकलला मागून येणाऱ्या गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या अंकलेश्वर डेपोच्या बस क्र. जी जे18 झेडने ओव्हरटेक करण्याचा नादात मागून धडक दिल्याने मोटरसायकल वरील अवंतिका कलाल ह्या दूर
फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याचवेळी आजूबाजूचे लोक व इतर वाहनचालकानी त्यांना दवाखान्यात नेले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नंदुरबार येथील दवाखान्यात नेत असताना अवंतिका यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. अभिजित कलाल यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. याबाबत नंदुरबार शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोदा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राहुल पवार, पोउनि सागर गाडीलोहार करीत आहेत.