बसवर दगडफेक नाशिक-शहादा बसमधील घटना, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

शहादा : नाशिक-शहादा बस सप्तशृंगी माता मंदिरालगत आली असता काही समाजकंटक विघातक वृत्तीच्या लोकांनी एकत्र येत राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. घडलेल्या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

शहरातील सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे. या घटनेबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी केले आहे.
रविवारी सायंकाळी नाशिक येथून शहादाकरीता बस (क्रमांक एमएच १४ बीएफ १७२२) ही बस निघाली होती. या बसचे चालक यूसुफ तडवी तर वाहक आर. एम. लोहार होते. ही बस नाशिक येथून धुळे बस स्थानकात आली तेथे पंचवीस ते तीस प्रवाशी बसमध्ये बसले होते. बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळाली नाही. या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. बस देवपूर बसस्थानकात पोहचल्यावर वादविवाद घालणाऱ्या प्रवाशापैकी काही तेथेच उतरून गेले होते. तेथून बस शहाद्याकडे निघाली असता बस देवपूर बसस्थानकातून निघाल्यानंतर उतरलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी व्यक्तीने शहादा येथे भ्रमणध्वनी करत घडलेली घटनेला वाढवून चढवून उद्रेक होईल, अशा पद्धतीने सांगितली.

समाजकंटक मोठ्या संख्येने जमले
नंतर शहरातील काही समाजकंटक मोठ्या संख्येने रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्र येत शहादा बसस्थानकावर पोहचले. त्यापैकी अनेक तरूण थेट सप्तशृंगी माता मंदिरात येवून थांबले होते. रात्री ९ वाजेच्या दरम्यान नाशिक बस प्रवाशांसह येत असताना शहादा शहारातील सप्तश्रृंगी माता मंदिरासमोर भगवा चौक रोडावर अचानक बस अडवून बसच्या समोरील काचेवर दगड मारुन त्यात बसच्या पुढील काच फोडून अंदाजे २५ हजार रुपयाचे नुकसान केले. चालक युसुफ हमिद तडवी (वय २८) व वाहकाला धुळे येथील देवपूर बस स्थानकावर बसमधील प्रवाशांना खाली का उतरवून दिले. या कारणावरुन आरडा ओरड करून व वाईट वाईट शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. बसच्या दरवाज्याजवळील वाहकाजवळील खिडकीतून हात घालून वाहकाची गच्ची पकडण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याची तक्रार चालक युसुफ तडवी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आतीफ नेहाल अन्सारी, सोहिल जहिर मिस्तरी, नदिम यासीर अन्सारी, वसीम आण्णा अंसारी, अख्तर भांडेवाला पूर्ण नाव माहीत नाही सर्व रा. शहादा यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत