जळगाव : भाऊबीजनिमित्त बहिणीला भेटण्यासाठी गावाकडे जात असताना धावत्या रेल्वेतून पडल्याने शिक्षक भावाचा मृत्यू झाला. मोबाइलवर नातेवाईकांचा फोन पोलिसाने रिसीव्ह केल्यानंतर मयताची ओळख पटली. विजय श्याम सोनी (22) रा.बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. बुधवार, 15 रोजी दुपारी शिरसोलीजवळ ही दुर्घटना घडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर गुरुवार, 16 रोजी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विजय सोनी हे वर्षभरापासून शहरातील रुस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते प्रभात कॉलनी परिसरातील भाडेतत्वाने ते एका घरात वास्तव्यास होते. त्यांची एक बहिण पाचोरा येथे तर एक बहिण बऱ्हाणपूर येथे राहते.
बऱ्हाणपूर येथे भाऊबीजसाठी ते रेल्वेने प्रवास करत असताना शिरसोली येथे खांबा क्रमांक 407 जवळ डब्यातून ते खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. स्टेशन मास्तरने खबर दिल्यानुसार लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सचिनकुमार भावसार हे घटनास्थळी रवाना झाले. मयताजवळ एक मोबाइल, बॅग तसेच मनीपाकीट आढळून आले. त्यांनी मयताला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले. दरम्यान, नातेवाईकाचा विजय सोनी यांच्या मोबाइलवर कॉल आला. तो हेकॉ भावसार यांनी रिसीव्ह केला असता मृत व्यक्ती विजय सोनी असल्याची ओळख पटली. गुरुवारी नातेवाईक जळगाव येथे दाखल झाले. विजय सोनी हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील,दोन बहिणी असा परिवार आहे. ते कुटुंबातील एकुलते होते. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर नातेवाईक बऱ्हाणपूरकडे रवाना झाले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेकॉ सचिनकुमार भावसार करत आहेत