बांगलादेशात हिंदूंविरुद्ध सुरु असलेला नरसंहार पाहता येथील परिस्थिती अत्यंत गंभीर असून तत्काळ आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी जगभरातून होत आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारकडे हिंदूंच्या रक्षणाची मागणी सर्वत्र होत आहे. बांगलादेशी हिंदूंकरीता आणि इस्लामिक कट्टरतावाद्यांविरोधात विश्वसमुदायाने संघटित होण्याचे आवाहन विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केले होते. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र निदर्शने करत असल्याचे दिसते आहे.
बांगलादेशातील सध्याची राजकीय अशांतता देशाच्या हितासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तेथील सर्व नागरिकांसाठी न्याय आणि समानता सुनिश्चित करणाऱ्या जलद ठरावाची आशा असल्याचे मत हिंदू स्वयंसेवक संघाने नुकतेच व्यक्त केले आहे. बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी भारताने सर्वतोपरी प्रयत्न करवेत असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आले आहे. त्यानंतर आता भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मलेशिया, वॉशिंग्टन डीसी, फिनलंड, बांगलादेश अशा विविध ठिकाणी हिंदू समाजाने रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केल्याचे पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वजण बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संघटीत झाले आहेत.
संयुक्त राष्ट्रानेही बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर निषेध व्यक्त केला आहे. आम्ही वांशिक आधारावर होणारे हल्ले आणि हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात आहोत. आम्ही निश्चितपणे बांगलादेशचे सरकार आणि लोकांना आवश्यक वाटेल त्या मार्गाने पाठिंबा देण्यास तयार आहोत. बांगलादेशमध्ये अलिकडच्या आठवड्यात सुरू असलेला हिंसाचार संपुष्टात येईल याची आम्हाला पुन्हा एकदा खात्री करायची आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते यांनी ही माहिती दिली.