जळगाव : बांधकाम इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने एका परप्रांतीय मजूराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील नायरा पेट्रोल पंप परिसरात रविवार २६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुदाम दिलीप शर्मा (२६) रा. दिनाजपुर पश्चिम बंगाल ह.मु. शिवकॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.
सुदाम दिलीप शर्मा हा कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात वास्तव्याला होता. रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदाम पेट्रोल पंप परिसरात इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. नेहमीप्रमाणे रविवार, २६ रोजी सायंकाळच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी काम करत असतांना त्याचा तोल जावून पाचव्या मजल्यावरून पडला.
त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.