‘बाप को भेज…!’

‘मी गेल्या दीड वर्षांपासून सांगतोय्, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि वरळी मतदारसंघातून माझ्याविरुद्ध निवडणूक लढावी, नाहीतर मी ठाण्यातून लढतो,’ असे आव्हान माजी मंत्री, बाळासाहेबांचे नातू, उद्धव साहेबांचे पुत्र युवराज आदित्य साहेबांनी पुन्हा दिले. मागे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंनी वरळीत सभा घेऊन त्या एका नाना पाटेकरच्या चहाच्या जाहिरातीतला ‘बाप को भेज, तेरे बस की बात नही!’वाला ‘डॉयलॉग’ मारून त्याला प्रत्युत्तर दिले होते. तरीही आदुबाळाचे समाधान झाले नाही. बाळाचा पोटशूळ मधूनमधून उमळताना दिसतोच.

बरं, आदित्य ठाकरेंना साहेबच म्हणावं लागतं; मग वयोवृद्ध असलात तरी! मागे रामदास कदमांनी सांगितले होते ना… साहेब नाही म्हटलं तर साहेबांना राग येतो म्हणून. आता पक्षाचे कार्यकर्ते ते ज्येष्ठ असले, तरी त्यांच्याकडून जबरदस्ती साहेब म्हणवून घेतले जाऊ शकते. पण मुळात बेताल बडबडीतून आपल्या बुद्धीचा बाळबोधपणा दाखविल्यानंतर कोणीही आदुबाळच म्हणेल. शिवाय काही लोक तर समाजमाध्यमांवर ‘पेंग्विन’ अशा टोपणनावाने संबोधताना दिसतात. एवढेच नव्हे, महाराष्ट्राच्या पप्पूची उपमादेखील नेटकर्‍यांनी यांना दिलेली आहे, ती वेगळीच…

या आदुबाळाच्या पुनर्वसनासाठी बापाने काय काय प्रयत्न केले ते अख्ख्या राजकीय वर्तुळाला माहिती आहे. वरळीची जागा निश्चित करण्यापासून तेथील आमदाराचा राजीनामा घेऊन, इतर प्रतिस्पर्धी पक्षांना हातापाया जोडून कसाबसा निवडून आणण्यात मोलाचा, नव्हे सिंहाचा वाटा हा एकनाथ शिंदे नावाच्या तत्कालीन शिवसेनेच्या दुसर्‍या क्रमांकाच्या नेत्याचा होता. आता आदुबाळाच्या निवडणुकीची पटकथा ज्याने लिहिली त्याच माणसाला हा बाळ आव्हानं देत फिरतोय्. यावरून बाळाच्या बुद्धीची कल्पना आपल्याला येते. बाळ रांगत होता तेव्हा हा शिंदे नावाचा वाघ लाठ्याकाठ्या खात, रक्ताचं पाणी करत संघटना वाढीचं काम करत होता आणि आज वरळीतूनच निवडून येण्याचे वांधे असणारा तोच बाळ ठाण्यातून लढण्याच्या वल्गना करताना आणि राजकारणात बापाला चितपट केलेल्या आपल्या बापाच्या बापाला आव्हान देताना दिसतोय्… ऐकावं ते नवलंच…

कहेना क्या चहाते हो…!
निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते. निवडणुका होत नाहीत. पुणे, चंद्रपुरात निवडणुका नाही, सिनेटची निवडणूकदेखील हे घेत नाहीत. यांच्यात निवडणुका घेण्याची हिंमतच नाही… ही वाक्ये आहेत आदित्य साहेबांची. तर, प्रजा बेरोजगारी, महागाईने तळमळत असताना, तीन राज्यांच्या विजयात राजा मग्न आहे, हे वक्तव्य आहे आदुबाळ साहेबांच्या नोकर साहेबांचे. आणि राज्यातील शेतकर्‍यांवर संकटं आली असताना, आपले मुख्यमंत्री दुसर्‍या राज्याच्या प्रचारात मग्न आहेत. हा आरोप आहे मोठ्या साहेबांचा. शिवाय पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान प्रचार करत असताना देशात अनेक समस्या आहेत; समस्या सोडविण्यापेक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पाच राज्यांत प्रचार महत्त्वाचा वाटला; निवडणुका महत्त्वाच्या वाटल्या का? असा प्रश्न नोकर साहेब आणि मोठे साहेब करताना दिसले होते. आता निवडणुका घेतल्या आणि त्यात प्रचार केला तरी यांचा आक्षेप आणि निवडणुका नाही घेतल्या, तरी यांचा आक्षेप! त्यामुळे निवडणुका घ्यायच्या की नाही… त्यामुळे या तिघांची नेमकी भूमिका काय? याबाबत तिघांनीही एकत्र बसून आधी काय ते एक ठरवावे… एकमत करून बाहेर मत प्रदर्शित करावे. नाहीतर मग ‘अरे भाई कहेना क्या चहाते हो…’ असेच म्हणतील लोक.

घाबरणार कशाला आणि कोणाला?
मोठे साहेब मुख्यमंत्री असताना एक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली. विरोधात असताना भारतीय जनता पक्ष पहिल्या आणि शिवसेना चौथ्या क्रमांकावर होता. आता अलिकडे ग्राम पंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात भारतीय जनता पक्ष पुन्हा पहिल्या, अजित पवार गट दुसर्‍या, शिंदे गट तिसर्‍या क्रमांकावर होता आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या शरद पवार गटाच्या कोसोदूर राहून उद्धव ठाकरे गटाने सहावे हे मानाचे स्थान पटकावले. मनसेने तर यावेळी, ‘बरं झालं आम्ही ही निवडणूक लढविली नाही,’ अशा शब्दात खिल्ली उडवली होती. मग अशी दयनीय परिस्थिती असणार्‍या गटाला घाबरून निवडणूक घेणार नाही, असा कोणाचा समज असेल किंवा असे वक्तव्य कोणी करत असेल, तर हे सगळं हास्यास्पदच म्हणावे लागेल, नाही का? आता कदाचित बापाला कल्पना असावीदेखील, पण बोलणारा शेवटी पप्पूचं… त्याला इलाजही नाही…

खाज मिटवा ना…
आता सत्ता गेल्यापासून मुख्यमंत्र्यांना जिथे-तिथे जाऊन राजीनामा द्या आणि माझ्याविरुद्ध निवडणूक लढा, असे आव्हान आदुबाळ सातत्याने देत असताना दिसतात. नुकतेच नागपूर अधिवेशनाच्या सातव्या दिवशीदेखील पुन्हा एकदा बाळाने आव्हान दिल्याचे बघायला मिळाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर घाबरून राजीनामा देत नसतील, तर जाऊ देत. सोड त्यांचा नाद… येत्या चार महिन्यांत एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्या निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदेंविरुद्ध निवडणूक लढवून, श्रीकांत शिंदेंना अस्मान दाखवून द्यावे… नंतर पुन्हा चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा कुठं पळून जातील एकनाथ शिंदे? तुमच्या भीतीने राज्याच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात जाऊ द्यात त्यांना. शोधून त्यांच्या विरोधात दंड थोपटूच आपण… किंवा मग ठाकरे गटाच्या अनेक भविष्यवेत्त्यांच्या भविष्यवाणीनुसार 31 डिसेंबरनंतर सरकार तर पडणारच आहे. मग आता काय केवळ काही दिवसांचा अवधी आहे. सरकारच पडले तर निवडणुका लावणं भागच आहे… तेव्हा बघून घ्या गद्दारांना. दीड वर्षे वाट बघितलीच ना आपण… आता थोडा काळ अजून कळ सोसा, बस लवकरच आपली सारी खाज मिटविण्याची संधी मिळेल, साहेब…

– नागेश दाचेवार