बारामतीचे महायुद्ध… पवार घराण्यात महाभारत!

दे शाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. चर्चा रायबरेलीमध्ये काय होईल? किंवा अमेठीमध्ये कोण जिंकेल याची नाही.लढण्याआधीच गांधी परिवाराने शस्त्र टाकली आहेत. लोकसभा सोडून सोनिया गांधी यांनी राज्यसभा जवळ केली. राहुल गांधीही आणखी एखादा वायनाड मिळतो का? त्या शोधात आहेत. पळापळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी २८ विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या इंडिया आघाडीच्या चिंधड्या उडाल्या आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तर व्हेंटिलेटरवर गेली आहे. १० दिवसांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. यांचे अजून जागावाटप ठरत नाही. राजकारणाचा चिखल झाला आहे.

गेल्या दोन वर्षांत आपण दोन पक्ष फुटलेले पाहिले. उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली, शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली. पक्ष सांभाळू शकत नाहीत ते मोदींशी काय लढणार? राजकीय पक्षच फुटताहेत असे नाही. राजकीय घराणीही फुटत आहेत. या वेळची निवडणूक आरपारची लढाई असेल. गेली ४० वर्षे महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार यांच्याभोवती फिरत आले. यावेळी त्यांचा पक्षच नव्हे तर घरही फुटले आहे. बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यालाही हादरे सुरू झाले आहेत. पुतण्यानेच काकाला ललकारले आहे. राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांच्या नावावर होता; मात्र पक्ष चालवण्यासाठी कराव्या लागतात त्या साऱ्या गोष्टी त्यांचा पुतण्या म्हणजे अजितदादा पवार करीत आले.

इतकी वर्षे खपून गेले. आता पक्षाची मालकी देण्याचा प्रश्न आला तेव्हा खटके उडाले. ८३ वर्षे वय होऊनही शरद पवार रिटायर व्हायला तयार नाहीत. शरद पवारांना सुप्रिया सुळे या आपल्या खासदार मुलीकडे पक्षाची सूत्रे द्यायची आहेत. तिकडे उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाचा राज्याभिषेक करायचा आहे. प्रॉपर्टीसारखेच हे भांडण आहे. महाराष्ट्राला घराण्यांची लढाई नवी नाही. मात्र, सर्वात बलाढ्य पवार घराण्यातच भांडी वाजू लागल्याने खळबळ आहे. एकमेकाला संपवण्याच्याच जिद्दीने काका-पुतण्या भिडले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर हा संघर्ष अधिक धारदार होत चालला आहे. सुरुवातीला काका-पुतण्याचा हा संघर्ष ‘मिलीजुली कुस्ती’ वाटत होती. आता दोघेही उघडपणे आखाड्यात उतरले आहेत. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी ही लढत रंगत जाणार आहे. काकाला आपल्या मुलीकडे पक्ष द्यायचा आहे तर पुतण्याला पक्ष खिशात हवा आहे. काका देत नाही असे दिसताच. अजितदादांनी पक्षच फोडला आणि भाजपासोबत सरकारमध्ये बैठक मारली.

बारामतीमध्ये शरद पवारांचे प्राण आहेत. बारामती पडली तर शरद पवार संपले. त्यामुळे अजितदादांनी पहिला हल्लाबोल बारामतीवर केला आहे. पुतण्याचा चक्रव्यूह काका कसा भेदतात ते पाहायचे. कारण आता तह नाही. तुमच्या पोटी जन्माला आलो नाही हा माझा गुन्हा आहे का? असा जाहीर सवाल करून अजितदादांनी रणशिंग फुंकले आहे. कशी असेल बारामतीची निवडणूक? शरद पवार हे तेल लावलेले पैलवान आहेत. ५० वर्षांच्या राजकारणात पवारांनी अनेकांना संपवले. आता आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना पुतण्याशी दोन हात करावे लागत आहेत. सुप्रिया सुळे गेल्या तीन निवडणुका बारामतीमधून जिंकत आल्या आहेत. संसदरत्न पुरस्कारही त्यांनी पटकावले.

मात्र, शरद पवारांची मुलगी या पलीकडे त्या स्वतःची ओळख निर्माण करू शकल्या नाहीत. आतापर्यंत बहिणीची निवडणूक म्हणून अजितदादाच मोर्चा सांभाळत आले. बारामती मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात अजितदादांचा एक बारामती मतदारसंघ आहे. बारामतीमध्ये मिळणारी लीड सुप्रियांना जिंकवून द्यायची. आता मात्र मुलीची निवडणूक ८३ वर्षे वयाच्या बापाला लढावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे फक्त दीड लाख मतांनी निवडून आल्या होत्या. आता तर भाऊ विरोधक म्हणून समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे काकाला निवडणूक सोपी नाही. ही निवडणूक कशी वळण घेते त्यावर सारा खेळ आहे. निवडणूक भावनिक मुद्यावर जाईल अशी अजितदादांना भीती आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दादांनी तसे सांगूनही टाकले. आपली ही शेवटची निवडणूक आहे असा प्रचार शरद पवार करतील.

त्या भावनिक प्रचाराला भुलू नका, असा इशारा अजितदादांनी दिला. उद्धव ठाकरे हे माझा बाप चोरला, पक्ष चोरला असे सारखे म्हणत असतात. शरद पवारही सहानुभूतीचे कार्ड खेळू शकतात. राजकारणात सारे क्षम्य असते असे म्हणतात. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद सारे डावपेच यावेळी खेळले जातील. शरद पवार मुरलेले राजकारणी आहेत. भावनिक वळणावर ते निवडणूक नेतील. त्याशिवाय, त्यांच्याकडे सांगण्यासारखे दुसरे आहे काय? दादा फिल्डमध्ये काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या भागात कुठे काय सुरू आहे याची बारीकसारीक माहिती ते ठेवतात. दादांचा उमेदवार महायुतीचा उमेदवार असेल.

मात्र, त्याच्याकडे कमळ नसेल. तो घड्याळवर लढेल. घड्याळ नाही याचा फटका काकाला किती बसेल? आपल्याला चिन्हाचा फरक पडत नाही अशी शरद पवारांची गुर्मी आहे. त्या हिशोबाने दादा आपल्या काकांपेक्षा भारी ठरतात. खरा पेच मतदारांपुढे आहे. मतदार काकांचं ऐकतात की पुतण्याचं हा खरा कळीचा मुद्दा आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार कोण असेल? अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा यांना उभे केले जाईल, असा सध्यातरी रंग आहे. सुनेत्रा यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. एक लिहह्न ठेवा; उमेदवार कोणीही असले तरी ही निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा अशीच होणार आहे. निवडणुकीला अजून दोन महिने आहेत. ते शरद पवार आहेत. हवा नसेल तर सुप्रिया ‘बाबा मला वाचवा’ म्हणू शकते. त्या हवेत अखेरच्या क्षणी शरद पवार स्वतः उभे राहतील.

तसे झाले तर ‘काका मला वाचवा’ म्हणण्याची वेळ अजितदादांवर येऊ शकते. काकाने माझी शेवटची निवडणूक म्हटले तर काय होईल? पण या वयात निवडणुकीची दगदग शरद पवारांना झेपेल? शेवटी वयाच्या मर्यादा येतातच. त्यांचे वय झाले आहे, शारीरिक व्याधींनी पवार त्रस्त आहेत; पण कन्यामोहापोटी पवार काहीही करू शकतात. पावसातल्या सभाही करतील. बारामतीची निवडणूक मोठी थरारक राहणार आहे. बारामती जिंकणे हे अजितदादांपेक्षा भाजपासाठी महत्त्वाचे आहे. भाजपाने अश्वमेधाचा घोडा सोडला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मार्गावरचे मुख्य अडथळे आहेत. पवारांनी उद्धव ठाकरेंना फितवून महाआघाडी सरकार बनवले. उद्धव यांनी त्या कामी दगाबाजी केली. हिंदुत्वाशी दगा देणाऱ्यांना माफी नाही. भाजपाला या दोघांनाही राजकारणातून संपवायचं आहे. या रणनीतीत भाजपा फार आधीपासून कामाला लागला आहे.