पुणे : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकीतही बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. युगेंद्र पवार यांनी आपल्या स्वाभिमान यात्रेला सुरुवात केली असून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे, अजित पवारांचे पूत्र जय पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार सामना रंगणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
युगेंद्र पवार यांनी मंगळवारपासून स्वाभिमान यात्रेला सुरुवात केली असून याद्वारे ते बारामतीतील गावांना भेटी देणार आहेत. दरम्यान, त्यांना विधानसभेच्या उमेदवारीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “अजूनपर्यंत कुणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. परंतू, स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांना भेटत राहण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. बारामतीत युगेंद्र पवार आणि जय पवार असा सामना झाल्यास अजितदादांसाठी आम्ही दोघेही सारखेच आहोत. त्यामुळे मी नक्कीच अजितदादांचे आशिर्वाद घेईल,” असे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
दुसरीकडे, रविवारी बारामतीतील एका सभेत बोलताना अजित पवारांनी एक विधान केलं होतं. “बारामतीत एवढी कामं करूनही बारामतीकर वेगळा निर्णयसुद्धा घेऊ शकतात. पण असं होत असल्यास झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली. मी आता ६५ वर्षांचा झालो. बारामतीकरांना एकदा मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे. मग त्याच्याशी माझ्या कारकिर्दीची तुलना करा,” असे ते म्हणाले होते. शिवाय काही दिवसांपूर्वी जय पवारांच्या उमेदवारीचीही चर्चा रंगली होती. त्यामुळे यंदा बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना रंगणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.